मालवणमध्ये पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

10

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण-आचरा-देवगड मार्गावरील महत्वाचा दुवा ठरणाऱ्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस लेखी आश्वासन न दिल्यास २९ जून रोजी कोळंब पुलावर उग्र रास्तारोको आंदोलन केले जाईल. असा इशारा मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी दिला. अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आलेल्या धोकादायक कोळंब पुलाच्या दुरुस्तीबाबत गोपीनाथ तांडेल व शेकडो मच्छीमारांनी कोळंब पुलानजीक आमरण उपोषण छेडले.

आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकामाचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण, पी डी पाटील यांनी भेट दिली. पुलाच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी रुपये मंजूर आहेत. निविदा प्रक्रिया काढण्यात आली. महिनाभरात वर्क ऑर्डर निघेल. व जानेवारीत पुलाची दुरुस्ती पूर्ण होईल असे सांगितले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी ग्रामस्थांनी महाड दुर्घटनेतील सावित्री नदीवरील पूल सहा महिन्यात पूर्ण केला जातो. मात्र कोळंब पूल सात महिने दुरुस्तीच्या परवानगी प्रक्रियेत अडकतो, याला उदासीन धोरण जबाबदार आहे. या महत्वाच्या मार्गावर जो पर्यायी मार्ग देण्यात आला आहे तोही अत्यंत धोकादायक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सात वर्षांपूर्वी या पुलाचे पिलर्स धोकादायक असल्याचे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला सांगूनही याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या