शिक्षक बँकेच्या सभेत विरोधकांनी फडकवले काळे झेंडे

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच, विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मागण्यांचे फलक झळकवले. यावेळी विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले. मात्र, विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मागण्यांचे फलक झळकवण्यात आले. सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मृत संजीवनी योजने’त वाढ करून मयत सभासदांची कर्जमाफी तसेच एनपीएसधारकांच्या मदतीत भरीव वाढ करण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा अनिता काटे, अमोल शिंदे, रूपाली गुरव, शामगोंडा पाटील, धनाजी घाडगे, संजय महिंद, अशोक घागरे, शिवाजी जाधव, फत्तू नदाफ, नितीन चव्हाण, अजित पाटील, गांधी चौगुले, शब्बीर तांबोळी, संतोष जगताप, मीलन नागणे, राहुल पाटणे, अमोल माने, सचिन खरमाटे, कृष्णा पोळ उपस्थित होते.

बँकेचे सीईओ बाळासाहेब कोले यांनी सभेचे नोटीस वाचन केले. तर, गत सभेचे वृत्तांत वाचन व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी केले. चेअरमन शिंदे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांना सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच, विरोधकांनी काळे झेंडे दाखवले. अध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, ‘मृत संजीवनी योजने’अंतर्गत वर्गणी शंभर रुपयांवरून तीनशे रुपये केल्यामुळे कर्जदार सभासदांना 25 लाखांपर्यंतचे, निष्कर्जी सभासदांना सात लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.

पुरेशी तरतूद झाल्यास ही रक्कम 25 ऐवजी 30 लाख आणि सातऐवजी दहा लाखांपर्यंत वाढवण्यात येईल. यावेळी शशिकांत बजबळे यांनी ‘मृत संजीवनी योजने’ची वर्गणी कमी करण्याची मागणी केली. मात्र, शिंदे यांनी वर्गणीत केलेली वाढ योग्य असल्याचे सांगत पुन्हा एकदा सभासदांची मंजुरी घेतली. रमेश पाटील यांनी इमारत फंड तरतूद रद्द करून लाभांश वाढवण्याची मागणी केली. बहुमताने ही मागणी फेटाळत इमारत निधी तरतुदीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा विरोधकांकडून निषेध

शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देऊ म्हणत तासाभरातच सभा गुंडाळली. विरोधकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना अध्यक्षांची भंबेरी उडाली. प्रश्न विचारला असता, उत्तर देण्याचे टाळले, असा आरोप करत बँक बचाव कृती समितीने माजी अध्यक्ष यू. टी. जाधव, हरीबा गावडे, शशिकांत बजबळे, रमेश पाटील, सतीश पाटील आदींनी सभागृहाच्या बाहेर निदर्शने केली.

गुरुजींच्या गोंधळाची परंपरा खंडित

यंदा अनेक वर्षांनंतर रविवारी झालेल्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुजींचा होणारा राडा, गोंधळ झाला नाही. सत्ताधाऱ्यांचे नियोजन व विरोधकांच्या सहकार्यामुळे शिक्षकी पेशाला गालबोट लागण्याची परंपरा यावेळी खंडित झाली.