प्लॅन केला म्हणून पकडले, गृहमंत्री शहांना काळे झेंडे दाखवण्याचा विचार करणारे 145 जण पोलिसांच्या ताब्यात

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा विचार करणाऱ्या 145 जणांना पोलिसांनी पकडलं आहे. हे सगळेजण थंथाई पेरीयार द्रविडर कळघम संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या संघटनेने शहा यांचा निषेध करण्याचं ठरवलं होतं. त्यांच्याप्रमाणे पुद्दुचेरी काँग्रेसचे अध्यक्ष ए.व्ही.सुब्रमण्यम , माजी मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी आणि इतर काही राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहा यांचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी शहा यांचा ताफा ज्या पक्कामोद्यानपेट भागातून जाणार होता त्याच मार्गावर आंदोलन करायचं ठरलं होतं. मात्र त्यांनी आपले आंदोलनाचे ठिकाण बदलून कामराज सलाई येथे निदर्शने केली. या काँग्रेस नेत्यांनी कामराज सलाई इथे आंदोलन केलं आणि ते तिथून निघूनही केले, पोलिसांनी त्यातल्या कोणावरही कारवाई केली नाही.

शहा हे रविवारी म्हणजेच 24 एप्रिल रोजी एक दिवसाच्या पुद्दुचेरी दौऱ्यावर आले होते. क्रांतीकारक, सुधारणावादी आणि तत्वज्ञ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या ऑरबिंदो यांच्या 150 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहा यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच विविध राजकीय संघटनांनी त्यांचा विरोध करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने एक वर्ष पूर्ण झालं तरीही पूर्ण करणात आली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मोदी आणि शहा हे तमिळ हद्दपार करण्यासाठी हिंदी लादत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांकडून केला जात होता. दौऱ्यापूर्वी 145 कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतरही थंथाई पेरीयार द्रविडर कळघम संघटनेच्या 200 कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असं इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.