जालन्यातील अंबडमध्ये केंद्र सरकार, ईडीच्या विरोधात तीव्र निदर्शने; जोरदार घोषणाबाजी

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात मंगळवारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार व ईडीच्या आडमुठ्या धोरणाचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षीयांच्या वतीने भाजप हम से डरती है, ईडी को आगे करती है…ईडी.हाय..हाय.. अशा गगनभेदी घोषणा देत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या जुलमी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

तहसिलदार व पोलीस यंत्रणेला सर्वपक्षांकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपप्रणीत केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून विनाकारण महाराष्ट्रासह देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कारवाया केल्या जात आहे. ईडी,सीबीआय, इन्कमट्रॅक्स व इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाला धाक दाखवून लोकशाही संपुष्ठात आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील बनावट कारवाया तात्काळ भाजपप्रणित केंद्र सरकारने थांबवाव्या या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सर्व पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करुन निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, तालुकाप्रमुख अशोक बरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, शिवसेना शहरप्रमुख कुमार रुपवते, तालुका संघटक दिनेश काकडे, युवासेनेचे विनायक चोथे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पोलीसांना सर्वपक्षीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ईडीचा गैरवापर खपवून घेणार नाही -माजी आमदार सांबरे
सध्या राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणा असलेली ईडी, सीबीआय हे भाजपाचे हातातले बहुले बनले असून त्यामुळे एका सच्चा व संपादक असलेले संजय राऊत यांच्या विरोधात खोटे नाटे व बनावट स्वरुपाचे दाखले देत वेठीस धरले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपाची हुकूमशाही खपवून घेणार नाही, असा दमही शिवसेनेचे बदनापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी दिला.