अवकाळी पावसाने कांद्यासह द्राक्ष, डाळिंबबागा उद्ध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या – आमदार घोलप

30

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक तालुक्यातील लाखलगावसह परिसरात रविवारी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने द्राक्ष, डाळींब, कांदा पीक उद्ध्वस्त झाले असून, शिवसेना आमदार योगेश घोलप यांनी या नुकसानीची पाहणी केली. शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून शेतीपिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी हवालदील आहेत. रविवारी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पीके उद्ध्वस्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश घोलप यांनी लाखलगावसह तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. लाखलगावचे शेतकरी बहिरु जाधव, विनायक कांडेकर, बाबुराव जाधव, भानुदास कांडेकर यांसह सुमारे ६० शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा, कांदा, डाळिंब व इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत कर्जमाफी मिळाली पाहिजे, बी-बियाणे, औषधे व खते यांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी केली आहे.

या पिकांचे त्वरित पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी सूचना आमदार घोलप यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, विष्णूपंत म्हैसधुणे, योगेश म्हस्के, विनायक कांडेकर, अर्जुन जाधव, नवनाथ वलवे, विलास कांडेकर, किसन कांडेकर, दीपक वाघ उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या