शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या अन्यथा अद्दल घडवू

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचे फॉर्म भरुन घ्या. सबंधित अधिकाऱ्याकडे याची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. शेतकरी जगला तर राजा जगेल, प्रजा जगेल अन्यथा अन्न पाण्याविना मरण पत्करावे लागेल, असे त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले ते लक्षात ठेवा. अनेक बँका बुडव्या निरव मोदी सारख्यांना कर्ज देते. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा देत नसेल तर शिवसेना स्टाईलने शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळवून द्या. जो अडसर ठरेल त्याला अद्दल घडवा, असा आदेश शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.

येथील शेतकरी आधार केंद्र शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांना पीक विमा भरताना आर्थिक अडचणीला सामोरे जायला लागू नये यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘शिवनेरी’ शिवसेना कार्यालयात शेतकरी आधार केंद्र ऑनलाईन उघडण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातुन हजारो शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन फॉम भरून देण्यात येणार आहेत याचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी लातुर जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, विधानसभा संपर्क प्रमुख ललित कासले, शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सुनिता चाळक, संभाजीनगरचे शहरप्रमुख विश्वांभर स्वामी, नगरसेवक विरभद्र गादगे, क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुकाप्रमुख विलास पवार, भारत सांगवीकर, अनिकेत फुलारी, राम जाधव, दत्ता पाचंगे, माऊली देवकत्ते, सुधाकर जायभाये, लहू बारवाड, लक्ष्मण अलगुले, सुनिल हालसे, रामप्रसाद अय्या, लहू वाळके, मिथुन राठोड,राजु कांबळे, किरण कदम, शेतकरी रावसाहेब मुळे, संभाजी तेलंग, राम देवकत्ते, गोविंद सलगर, मधुकर वलसे, गणपत फुलमंटे, सोमन फुलमंटे, पांडूरंग वलसे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.