सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफचे पैसे! फक्त करा ‘हे’ काम…

1807

प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीसाठी त्याचा पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम महत्त्वाची असते. सेवानिवृत्तीनंतर या रकमेचा उपयोग त्या व्यक्तीला दैनंदिन खर्चासाठी होत असतो. मात्र, अनेकदा प्रशासनाच्या विलंबामुळे पीएफची रक्कम हातात पडण्यास उशीर होतो. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेत आता सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफचे पैसे मिळण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफची रक्कम मिळवायची असल्यास त्यांना आपला युनिव्हर्सल खाते क्रमांक ( यूएएन) आधार कार्डशी जोडावा लागणार आहे. यूएएन खाते क्रमांक आधारशी लिंक नसल्यास पीएफसंबंधी कोणत्याही सुविधा मिळण्यास अडचणी येणार असल्याने आधार आणि यूएएन क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे. केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त सुनील बर्थवाल यांनी पीएफच्या अधिकाधिक सुविधा मिळवण्यासाठी यूएएन आणि आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफचे पैसे मिळावेत, निवृत्तीवेतनही वेळेत सुरू व्हावे आणि ते नियमित मिळावे यासाठी ईपीएफओ नव्या प्रणालीबाबत विचार करत असल्याचे बर्थवाल यांनी सांगितले. 2017 मध्ये तत्कालीन श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी संसदेत या सुविधेबाबतची माहिती दिली होती. त्याचबरोबर व्यक्तीच्या वेतनातील काही रकमेसह कंपन्याही त्यांचा हिस्सा जमा करत असल्याची खातरजमा करण्यासाठी लवकरच ई निरीक्षण प्रणाली आणण्यात येणार आहे. ईपीएफओच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे 8 कोटी पीएफ खातेधारकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीची पीएफची रक्कम मिळणार आहे आणि निवृत्तीवेतनही वेळेत सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या