बांगड्याचे कसमूर आणि कोळंबीचे लोणचे

शेफ मिलींद सोवनी 

[email protected]

बांगड्याचे कसमूर हा खाद्यप्रकार प्रामुख्याने मालवणातला… पण इतर ठिकाणीही तो चवीने खाल्ला जातो. साधारणपणे सॅलेड, चटणी वगैरेमध्ये खमंगपणा असतो. पण सुका बांगडा… त्याचे कसमूर हा प्रकार आपल्याकडे फारसा नाहीच. मुळातच फिशचे लोणचे हा प्रकारच पोर्तुगिज, गोव्याकडचा… इस्ट इंडियातच तो दिसतो. अलिकडे आपल्याकडेही दिसू लागलाय. पण तरीही आपण असल्या प्रकारची लोणची करत नाही. म्हणून जरा वेगळी रेसिपी म्हणून मी ती येथे दिली आहे.

बांगड्याचा हा किसमूर सॅलेडसारखाही खाता येईल. तो करायलाही अतिशय सोपा आहे. नुसते भाजलेले बांगडे हाताने चुरून त्यात कच्चा कांदा, कोथिंबीर घातली आहे. हे बांगडे भाजायचीही एक खास पद्धत आहे. त्याला धूर देणंही म्हटलं जातं. कोळशाच्या निखा-यावर तूप किंवा खोबरेल तेल लावून त्याचा धूर या बांगडयांना दिला तर त्यांना छान चव येते.

प्रॉन्स लोणचे

प्रॉन्स लोणचे करताना प्रॉन्स ड्राय असतील तर जास्त चांगले. कोळंबीही शक्यतो छोटीच निवडावी. फिश हा प्रकार साधारणपणे बाजारातून आणला, शिजवला व खाल्ला… यासाठी तो योग्य असतो. कारण मासे फार काळ टिकत नाहीत. ते खराब व्हायची प्रक्रिया सुरू झालेली असते. पण लोणचे हा प्रकार टिकवून बरेच दिवस पुरवला जातो. म्हणून फिशचे लोणचे सहसा करत नाहीत. कोळंबीचे लोणचेही जास्तीतजास्त 4 ते 5 दिवसांत संपवावं लागतं. प्रॉन्स लोणचे हा प्रकार ठेवणीतल्या लोणच्यासारखा पुरवून खाता येणार नाही हे ते बनवतानाच लक्षात ठेवावे लागते. सांबार ब्लाचण ही मलेशियन रेसिपी आहे. यात मी ड्राय प्रॉन्सची पेस्ट बनवून ती घातली आहे. ही पेस्ट तयारही रेडिमेड मिळू शकते. यात जास्त काही नाहीय. फक्त लाल मिरची, प्रॉन्स आणि लिंबू…

जेवण कोणत्याही प्रकारचे, म्हणजे व्हेज किंवा नॉनव्हेज असले तरी मलेशियन लोक त्याच्यासोबत हे लोणचे घेतात. नुसता भात असेल तरीही त्याच्याबरोबर ते छान लागते. नुडल्स, वेगवेगळी सुप्स यांच्यासोबतही हे खास लोणचे मस्त लागते. सहसा लोणचे म्हटले की ते तोंडीलावणं म्हणून आपण वापरतो. पण मलेशियन लोक मुख्य जेवणाबरोबर एक जोडीचा पदार्थ म्हणून खातात.

 बघुया काही पाककृती….

कोळंबीचे लोणचे

साहित्यः  एक कप सोललेली कोळंबी, एक चमचा मोहरी, पाव चमचा मेथीचे दाणे, हळद, चिमुटभर हिंग, १ चमचा मिरची पावडर, थोडे तेल,  थोडे चिंचेचे पाणी,  मीठ चवीनुसार.

कृती: प्रथम कढईत तेल गरम करून त्यात कोळंबी घालायची. मंद आचेवर ती कुरकुरीत होईपर्यंत तळायची. कोळंबी जळणार नाही याची काळजी घ्यायची. आता त्यात मिरची पावडर, हळद, मोहरी-मेथी-हिंग पावडर आणि चिंच टाकायची. चवीसाठी थोडे मीठ घाला. याबरोबरच चवीसाठी आणखी काही पदार्थ घातले तरी चालेल. चिंचेतील पाणी कोरडे होईपर्यंत मध्यम आंचेवर शिजवून घ्यायचे. थंड झाले की हवाबंद बरणीत भरून ठेवायचे.

बांगडय़ाचे किसमूर

साहित्य २ मोठे सुके बांगडे, ३ हिरव्या मिरच्या, १ मोठा कांदा चिरलेला, नारळाचं पाणी अर्धा कप, हळद पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, चिंचेची पेस्ट ३ चमचे, ताजी कोथिंबीर कापून अर्धा कप, तेल २ चमचे.

कृती ः प्रथम सुक्या बांगडय़ांचे छोटे तुकडे करून धुऊन घ्यायचे व बाजूला ठेवायचे. कांदा आणि हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या. आता कढईत तेल तापवा आणि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. मग त्यात सुक्या बांगडयांचे तुकडे घालून किमान तीन मिनिटे तळून घ्या. नंतर त्यात कांदा, हळद पावडर, लाल तिखट आणि चिंचेची पेस्ट टाकून कांदा मऊसर होईपर्यंत शिजू द्या. कांदा शिजला की त्यात नारळाचं पाणी टाकून कसमूर आणखी पाच मिनिटे शिजू द्या. सुके बांगडे आधीच खारट असतात. त्यामुळे कसमूरमध्ये वेगळे मीठ घालायची गरज नाही. पाच मिनिटांनी फार तर कसमूर चाखून पहा. मीठ कमी वाटलं तर वेगळं थोडं मीठ घालू शकता. सर्व्ह करताना कसमूरवर कोथिंबीर भुरभुरवा. ही कसमूर माशाच्या गरमागरम रस्सा आणि भात यांच्यासोबत देता येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या