पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीएसआय पती बेपत्ता झाल्याची तक्रार

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळुन पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे १० सप्टेंबर पासून घरातून निघून गेल्याची तक्रार चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक्षकांसह वरीष्ठ काय भुमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापुर हे महत्वाचे पोलीस ठाणे असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे हे कार्यरत आहेत. यासोबतच एक एपीआय, दोन पीएसआय देखील या ठिकाणी कर्तव्यावर आहेत. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यातील पीएसआय तानाजी डिगांबर चेरले हे १० सप्टेंबर सोमवारी दुपारी २ वाजेपासुन कोठे तरी निघुन गेल्याची तक्रार चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. पोलिसांना सरस्वती तानाजी चेरले यांनी दिलेल्या फिर्याद दैनिक सामनाच्या हाती प्राप्त झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नाका बंदी व पेट्रोलींगसाठी पीएसआय पती तानाजी चेरले हे घरातुन बाहेर पडले व १० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता घरी आले. दिड ते तीन तास आराम करुन हिंदुस्थान बंद असल्याने १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता परत गणवेश घालुन पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दुपारी २ ला घरी परत आल्यावर त्यांना फोन आल्याने साध्या गणवेशात पुन्हा पोलीस ठाण्याकडे गेले.

घरातुन निघुन जातांना चेरले यांनी पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा मला खुप त्रास होत आहे, मला ते मानसिक त्रास देत आहेत असे सांगून घरातुन बाहेर पडल्याचे सरस्वती चेरले यांनी तक्रारीत नमुद केले आहे. तसेच ते घरी परत न आल्यामुळे सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन लावुन पती तानाजी चेरले हे घरी आले नसल्याचे सांगुन त्यांना परत आणुन द्या असे म्हंटल्यावर त्यांनी फोन कट केल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता पुन्हा केंद्रे यांना फोन लावल्यावर त्यांनी फोन उचलला नाही. माझ्या पतीचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला पोलीस निरीक्षक केंद्रे हे जबाबदार राहतील, असेही या तक्रारीत सरस्वती चेरले यांनी नमुद केले आहे. दरम्यान, याबाबत बाजू ऐकुन घेण्यासाठी दैनिक ‘सामना’ प्रतिनिधींने पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडुन नो रिप्लाय मिळाला.