वकिलाच्या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक

62

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

वकिलाच्या घरात घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवत दीड कोटीच्या खंडणीसाठी सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्याची फिल्मीस्टाईल घटना गारखेडा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली.

गारखेडा परिसरातील विद्यानगरातील ओम अपार्टमेंटमधील उच्च न्यायालयाच्या खंडपीठातील ऍड. श्रीकांत तात्यासाहेब कीर (40) यांची पत्नी ऍड. सोनाली श्रीकांत कीर हे कौटुंबिक कारणावरून गेल्या वर्षभरापासून विभक्त राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सोनाली या तिच्या मुंबई येथील कृष्णा बापुराव लाटकर या भावाकडे राहतात. त्यांचा सहा वर्षांचा रमन हा श्रीकांत यांच्याकडे राहतो, तर दहा वर्षांची मुलगी आर्या ही सोनाली यांच्याकडे मुंबईत राहते. दोन्ही मुलांच्या ताब्याबाबत कौटुंबिक न्यायालयात सध्या प्रकरण सुरू आहे. श्रीकांत यांच्याकडे रमन याचा सांभाळ करण्याबाबत न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने श्रीकांत यांनी मुलगा रमन यास घरी घेऊन आले होते. दरम्यान, 12 जून बुधवारी 2019 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीकांत हे घरी असताना सात जण हातात काठय़ा-चाकूसह त्यांच्या घरात घुसले. काही कळायच्या आत त्यांनी श्रीकांत व त्यांच्या आई-वडिलांना मारहाण करून मुलाचे अपहरण केले. तसेच दीड कोटी रुपये दिले तरच मुलगा परत मिळेल, अशी जाताना धमकीही दिली.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता यातील चेंबूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल रसिकलाल चव्हाण (29) आणि सागर विजय हंडे (28) हे दोघे पैठणला असल्याचे कळले. यावरून पोलिसांनी पैठणमधून दोघांना तर नगर येथून रमनचा मामा ऍड. कृष्णा बापुराव लाटकर (34) क शांभवी अनिल मालवणकर (25) यांना अटक केली. अपहरण झालेला रमन हा सध्या मुंबई येथे तिच्या आईजवळ असल्याचे घनश्याम सोनवणे यांना सांगितले. आज चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली

आपली प्रतिक्रिया द्या