सोरायसिसच्या रुग्णांनो, प्रवासात काळजी घ्या! तज्ञ डॉक्टरांनी दिला सल्ला

3143

सोरायसिसने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रवास जरूर करावा, मात्र तत्पूर्वी स्वतःच्या तब्येतीची पुरेशी काळजी घ्यावी, असा सल्ला सैफी रुग्णालयामधील डर्मेटोलॉजिस्ट डॉ. शेहनाझ आरसीवाला यांनी दिला आहे. सोरायसिसच्या रुग्णांना उन्हाचे दिवस हे थंड आणि कोरडय़ा हवामानापेक्षा कधीही चांगले असेही ते म्हणाले.

सोरायसिस हा रोगप्रतिकार यंत्रणा चुकीच्या पद्धतीने सक्रिय झाल्याने होणाऱया आजारांपैकी एक आजार आहे. यात नव्या त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा खूप वेगाने होते. साधारणपणे आपले शरीर दर 10 ते 30 दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते व या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या स्थितीमध्ये मात्र प्रत्येक तीन ते चार दिवसांत नव्या त्वचापेशी तयार होत असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो आणि त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात आणि त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरीसर खवल्यांसारखा स्तर बनतो, असे डॉ. आरसीवाला यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या