मनाचे खेळ

499

मानसशास्त्र… अभ्यासासाठी आणि करीयरसाठी उत्तम पर्याय.

सध्याची बदललेली जीवनशैली, स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती इत्यादी कारणांमुळे मानसिक, भावनिक समस्या निर्माण होतात. यासाठी मानसशास्त्राची गरज वाढत आहे. वैयक्तिक समुपदेशक म्हणून मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. शिवाय त्यांना अनेक क्षेत्रांत त्यांची मागणी आहे. मानसशास्त्र ही एक कला आहे शिवाय विज्ञानही. म्हणूनच काही विद्यापीठांमध्ये हा विषय कला शाखेद्वारे शिकवला जातो.

समुपदेशन हा मानसशास्त्र विषयातील एक विशेष अभ्यासक्रम. विद्यार्थी, पालक, वृद्ध सर्वांसाठीच समुपदेशन उपयोगी पडू शकते. स्पर्धात्मक युगातील अनेक समस्या, मानसिक दडपण यावर समुपदेशनाद्वारे एखादी व्यक्ती मात करू शकते. क्रिकेट, हॉकी इत्यादी सांघिक खेळांतील संघांचे मनोबल वाढवणारे ‘स्पोर्टस् सायकोलॉजिस्ट’ किंवा ‘गुन्हेगाराची मानसिकता’ समजून विश्लेषण करून पोलिसांना तपासकार्यात मदत करणारे ‘क्रिमिनोलॉजी, सायकोलॉजिस्ट’ असे वेगवेगवेगळे विषय मानसशास्त्राच्या अभ्यासात हाताळता येतात.

शैक्षणिक पात्रता
मानसशास्त्रात करीयर करण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण आवश्यक ठरते. पदव्युत्तर (एमए/एमएससी) शिक्षणासाठी किमान पात्रता म्हणजे मानसशास्त्रातील पदवी घ्यावी लागते. काही विद्यापीठांत पदव्युत्तर प्रवेशपरीक्षा घेतली जाते. पदव्युत्तर शिक्षणानंतर आपल्या आवडीच्या विषयातील डॉक्टरेट मिळवणे किंवा एखाद्या अभ्यासक्रम करणे असे पर्याय असतात.

समुपदेशन
एखाद्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणे म्हणजे समुपदेशन. ते ग्रुप, करीयर समुपदेशन, विवाह समुपदेशन, स्पोर्टस् समुपदेशन इत्यादी क्षेत्रांत काम करतात. हे लोक अनेक समस्या सोडवायला मदत करतात.

सामाजिक मानसशास्त्र
अभिक्षमता चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी संबंधातील कामे ही शाखा करते. मानसशास्त्रज्ञ समाजातील वागणुकीचा अभ्यास करतात. बाजार संशोधन संस्था, जाहिरात संस्था, सरकारी संस्था अशा ठिकाणी हे काम करतात.

क्लिनिकल सायकॉलॉजी
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ अनेकदा मानसरोग चिकित्सक किंवा इतर डॉक्टरांबरोबर काम करतात. डिप्रेशन, क्रिझोफेनिया, फोबिया अशा तीव्र मनोविकारांनी पीडित रुग्णांबरोबर काम करावे लागते. मनोरुग्णालयात, व्यसनमुक्ती केंद्रात, मतिमंद मुलांच्या शाळेत इत्यादी ठिकाणी क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ काम करतात.

संधी
मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रॅक्टिस (समुपदेशन ) करता येते. स्पेशलायझेशनला अनुसरून शाळा, महाविद्यालय, कारखाने, मार्केट रिसर्च गट, पुनर्वसन केंद्र, समुपदेशन केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, बाजार संशोधन केंद्र, जाहिरात कंपन्या, सरकारी समाजकल्याण विभाग इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात किंवा खासगी प्रॅक्टिस करत असतानाही या ठिकाणी समुपदेशनासाठी जाता येते. याशिवाय नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वरिष्ठ महाविद्यालयात किंवा बी.एड. करून कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणूनही संधी मिळू शकते.

इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी
कामगारांची उत्पादनक्षमता, कामाचा दर्जा वाढावा यासाठी त्यांच्या मानसिकतेचा वेध घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना औद्योगिक मानसशास्त्रज्ञ (इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट) म्हणतात. इतर लोकांबरोबर सुरळीत काम कसं करावे, कार्यसमाधान कसे उपलब्ध करावे, योग्य कामासाठी योग्य लोकांची नेमणूक करणे अशा जबाबदाऱ्या ते हाताळतात.

शैक्षणिक पात्रता
समुपदेशन अभ्यासक्रम करण्यासाठी मानसशास्त्र विषय घेऊन बी. ए. पदवी मिळवणे आवश्यक असते.
पदवीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर मानसशास्त्रामध्ये बी. ए. ही पदवी मिळते, परंतु मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास पदव्युत्तर शिक्षण घेणे अपरिहार्य आहे. यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका क्षेत्रात एम. ए. करावे लागते.

आवश्यक गुण
इतरांना मदत करण्यासाठी इच्छा, सोशिकता व स्वतःची ठाम मूल्यप्रणाली असणे महत्त्वाचे आहे. इतरांबरोबर सहजतेने संवाद साधण्याचे कसब असणे जरुरीचे आहे. तसेच इतर माणसांबद्दल मनापासून वाटणारी आस्था व भावनिक गुंतवणूक न करता आपुलकी वाटणे हे गुण मानसशास्त्रज्ञांसाठी आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या