Odisha Railway Accident – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सर्वोच्च न्यायालयात याचिका

Odisha Railway Accident – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

ओडीशातील बालासोर येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओडीशात झालेला हा अपघात गेल्या दशकातील सर्वात मोठा अपघात असून यात 288 जणांचा मृत्यू झाला तर हजारो जखमी झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेल्वे अपघात रोखण्यासाठी आणलेल्या कवच वरून देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. य़ा दरम्यानच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली आहे.

निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमून सध्या रेल्वे प्रवाशातील सुरक्षेची तपासणी करावी. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करा येईल, रेल्वे अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत तज्ज्ञाद्वारे अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सरकारला द्यावा, असे या याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विशाल यिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ओडिशातील बालासोर जिह्यात बाहानगर बाजार स्टेशनवर विचित्र अपघात घडला. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेस मालगाडीला धडकली आणि डबे घसरले. त्याचवेळी येणारी बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसची कोरोमंडल एक्प्रेसच्या डब्यांना धडकली. यामुळे बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसचेही डबे घसरले आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही एक्प्रेसचे डबे घसरल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. हा अपघात एवढा भीषण होता की, रेल्वे डबे तुटले, रूळ उखडले. शेकडो प्रवासी डब्यांमध्ये अडकले होते. कटरच्या सहाय्याने डबे तोडावे लागले. 24 तास झाले तरी बचावकार्य सुरू होते. आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक हजारांवर प्रवासी जखमी आहेत.