देशात सत्ताधारी पक्षाविरोधात जनमत, शरद पवार यांचे स्पष्ट मत

‘‘इंडिया टुडे-सी व्होटर’ने यापूर्वी केलेली सर्वेक्षणे अचूक ठरली असून, ‘मूड ऑफ नेशन’ सर्वेक्षणानुसार देशातील जनमत हे सत्ताधारी पक्षाविरोधात आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, ‘विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न असून, याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्रात काँगेसबरोबर आम्ही एकत्र आहोत,’ असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आदी उपस्थित होते.

‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणाकडे पाहता, या संस्थेने यापूर्वी केलेली सर्वेक्षणे अचूक ठरली आहेत. या सर्वेक्षणात दाखविल्यानुसार देशातील जनमत हे सत्ताधारी पक्षाविरोधात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता जाईल. तेथील लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. अन्य राज्यांतही अशीच परिस्थिती राहील, अशी शक्यताही पवार यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी’ने तयार केलेल्या माहितीपटावर बंदीच्या मुद्दय़ाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘‘विरोध आणि बंदी घालण्याचा प्रकार म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. शिवाय काही पक्ष विशिष्ट विचारधारा राबवीत असले, तरी धार्मिक मुद्दय़ांवर लोक मतदान करणार नाहीत. सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’त राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी सहभागी होत असून, या यात्रेला सर्वसामान्य जनतेचाही मोठा पाठिंबा आहे,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, भाजप आणि अजित पवार यांच्या शपथविधीसंदर्भात बोलताना, ‘‘या घटनेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, आता कशाला तो विषय?’’ असे पवार म्हणाले.

कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच!

‘‘भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून पायउतार करण्यात येत असल्याची चर्चा आपण ऐकली. याबाबत आमच्याकडेही ठोस माहिती नाही; पण आताचे जे राज्यपाल आहेत, त्यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल,’’ असे शरद पवार यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आम्ही एकत्र

‘‘सत्ताधारी पक्षांविरोधात आज जनमताची आकडेवारी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्रात काँगेसबरोबर आम्ही एकत्र आहोत. मात्र, प्रत्येक राज्यात असलेल्या वेगवेगळ्या समस्या आधी सोडवाव्या लागणार आहेत,’’ असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, ‘‘महाराष्ट्रात आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आम्ही एकत्र आहोत,’’ असे त्यांनी सांगितले. आमची वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांच्याबाबत काही हरकत असण्याचा मुद्दाच नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.