आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगावात जनआक्रोश आंदोलन, वेदांताच्या ‘दरोडय़ा’विरुद्ध उद्रेक,

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातील ‘खोके सरकार’च्या नाकर्तेपणामुळे गुजरातला पळवला गेला. त्याविरुद्ध राज्यभरात प्रचंड संताप आहे. त्या संतापाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. एक लाख तरुणांचे रोजगार बुडवणाऱया या ‘दरोडय़ा’विरुद्ध शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या तळेगाव येथे येत्या शनिवार, 24 सप्टेंबर रोजी ‘जन आक्रोश आंदोलन’ केले जाणार आहे.

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. ‘आमचा रोजगार, आमचा हक्क’ असा नारा देत शिवसैनिक आणि युवासैनिकांसह हजारो बेरोजगार युवक-युवती या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी 4 वाजता हे आंदोलन केले जाणार आहे.

ईडी सरकारला जाब विचारणार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांमुळे वेदांता-फॉक्सकॉन सेमीपंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. त्यासंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती; परंतु विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे तो प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे एक लाख मराठी तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आता त्या तरुणांनी काय करायचे? राज्य सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी काय करणार आहे? याचा जाब राज्यातील ईडी सरकारला या आंदोलनात विचारला जाणार आहे.