मिंधे सरकार शंभर टक्के जाणार, संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले जनता आमच्यासोबत… लढू आणि जिंकू

निवडणूक आयोगाने दबावाखाली निर्णय घेतले, ती लोकशाहीची हत्या आहे. जनतेनेही उघडय़ा डोळ्यांनी हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला बघितला आहे. जनतेच्या सोबतीने आम्ही या सगळ्याचा प्रतिकार करू, लढू आणि जिंकू, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मालेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या देशातील सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधान आणि घटना जीवंत आहे. राज्यात अस्तित्वात आलेले मिंधे-फडणवीस सरकार बेकायदेशीरच असून, गेल्या सहा-सात महिन्यात त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णयही बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार शंभर टक्के जाणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मालेगाव येथे 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे मालेगाव येथे आले होते. त्याप्रसंगी शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपनेते सुनील बागुल, अद्वय हिरे, गोवा राज्य संपर्कप्रमुख जीवन कामत, जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत उपस्थित होते.

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे म्हणून एका जिद्दीपोटी शिवसेना निर्माण केली. त्यांनी मला शिवसेनाप्रमुख करा असे सांगितले नाही, तर जनतेने त्यांना शिवसेनाप्रमुख हे पद दिले. जनतेनेच उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख हे पद दिले. ते निवडणूक आयोगाला विचारून दिलेले पद नाही. त्यामुळेच निवडणूक आयोगच काय तर कुणीही त्यांचे पद काढून घेवू शकणार नाही. कागदावरून नाव काढून घेतले तरी शिवसेना काय आहे हे तुम्हाला 26 मार्चला येथे पाहायला मिळेलच, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मुस्लिम तरुणांकडून हम तुम्हारे साथ हैचा नारा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवारी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर पाहणीसाठी पोहोचले. तेव्हा संपूर्ण मैदानामध्ये मुस्लिम तरुण क्रिकेट खेळत होते. खासदार संजय राऊत गाडीतून उतरत नाही तोच हे तरुण त्यांची भेट घेण्यासाठी धावत आले. जय महाराष्ट्र असे म्हणून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ‘हम तुम्हारे साथ हैअसे आवर्जून सांगितले.