पुदुचेरीतील काँग्रेसचे सरकार गडगडले, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामींनी दिला राजीनामा

मागील महिनाभर आमदारांच्या राजीनामासत्रामुळे डळमळीत झालेले पुदुचेरीतील काँग्रेस-डीएमके आघाडीचे सरकार अखेर सोमवारी गडगडले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे बहुमताच्या चाचणीला सामोरे न जाताच सत्ताधारी आमदारांना सोबत घेऊन सभागृहातून बाहेर पडले. नंतर त्यांनी नायब राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावाच्या परीक्षेत हरल्याचे विधानसभा अध्यक्षांनी घोषित केले. ही मोठी राजकीय उलथापालथ घडल्यामुळे काँग्रेसने दक्षिणेकडे उरलेला एकमेव गडही गमावला आहे.

काँग्रेस व डीएमकेच्या आमदारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल टी. सौंदरराजन यांनी मुख्यमंत्री नारायणसामींना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. अधिवेशनाच्या सुरुवातीला नारायणसामींनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव ठेवला. मात्र त्यावर मतदान सुरू होण्याआधीच ते व त्यांच्या सत्ताधारी पक्षातील आमदार सभागृहातून बाहेर गेले. पुढील काही वेळातच नारायणसामींनी राजभवनात नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतरच मोदी सरकारने नायब राज्यपाल बदलले. किरण बेदींच्या जागी टी. सुंदरराजन यांची प्रभारी नेमणूक केली.

नारायणसामी सरकारपुढे 25 जानेवारीला संकटांची सुरुवात झाली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नमस्सिवयम आणि थिप्पाइंजन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपचा हात धरला होता. पुढे 21 दिवसांनी मल्लादी कृष्णा राव यांनी आमदारकी सोडली. 16 फेब्रुवारीला जॉन कुमार यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचे आणखी एक आमदार धनवेलू हे गेल्या वर्षीच अपात्र ठरले होते.

आता काय घडू शकते?

  • नायब राज्यपाल हे निवडणूक होईपर्यंत नारायणसामींकडेच मुख्यमंत्रीपदाचा प्रभारी कार्यभार सोपवू शकतात.
  • रंगास्वामींच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाला सरकार बनवण्यास निमंत्रण दिले जाऊ शकते.
  • निवडणूक होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली जाऊ शकते.

हा राजकीय वेश्याव्यवसाय – नारायणसामी

पुदुचेरीत सध्या जे काय घडतेय, हा राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण अखेर सत्य पुढे येईलच. निवडणूक जिंकण्याची कुवत नसलेले विरोधक सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान रचताहेत. भाजप जबरदस्तीने हिंदी लादतेय. केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केलीय. पुदुचेरीची जनता आणि देश त्यांना धडा शिकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री नारायणसामींनी दिली.

11 महिन्यांत दुसरे राज्य काँग्रेसच्या हातून निसटले

काँग्रेसला गेल्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये पहिला हादरा बसला. ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे मार्चमध्ये कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुदुचेरीमध्ये काँग्रेसला दुसरा झटका बसला आहे. काँग्रेस सध्या राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगढमध्ये स्वबळावर सत्ता चालवत आहे. मात्र राजस्थानची स्थिती नाजूकच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या