मुलाने केली आईची हत्या, मृतदेहाजवळ सात दिवस बसून राहिला आणि …

सामना ऑनलाईन । पुदुच्चेरी

आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुदुच्चेरी येथे घडली आहे. येथे कौटुंबीक वादातून मुलाने आईची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तब्बल एक आठवडा मृतदेहासोबत राहिला. यानंतर तो स्वत: पोलीस स्थानकात पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. आरोपीचे नाव जे. अमलोरपवंथन असे असून त्याच्या आईचे नाव जयामेरी होते असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयामेरी यांच्या जयासेकरा उदैयर यांच्यासोबत विविह झाला होता. जयासेकरा यांचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर काही वर्षांनी 2013 मध्ये जयासेकरा यांचा मृत्यू झाला. यानंतर जयामेरी हिचा पतीच्या पहिल्या पत्नीसोबत संपत्तीवरून वाद सुरू झाला. जयामेरीच्या भीतीमुळे पहिली पत्नी सेल्वी हिने आपल्या भावाला बोलावून घेतले. यानंतर जयामेरी हिने सेल्वी हिच्या भावाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी जयामेरीसह आठ जणांना अटक केली होती.

जामिनावर बाहेर आल्यानंतर जयामेरी कृष्णानगर येथे राहायला गेली. येथे ती आपला मुलगा अमलोरपवंथन याच्यासोबत राहात होती. याच दरम्यान आईचे इतर पुरुषांशी संबंध असल्याचे कुणकुण अमलोरपवंथन याला लागली आणि तो नाराज झाला. याच कारणामुळे दोघांमध्ये वादही होत होते. परंतु वाद एवढा वाढला की अमलोरपवंथन याने आईची हत्या केली. एक आठवडा आईच्या मृतदेहासोबत राहिल्यानंतर त्याने पोलिसात आत्मसमर्पण केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या