दर्शनात्मक मूल्य

798

प्रा. विश्वास वसेकर

‘पुळका’ ही सुरेश कृष्णाजी पाटोळे यांची चौथी कादंबरी आहे. यापूर्वी त्यांनी ‘हेलपाटं’, ‘इमानतळ’ आणि ‘अभिमान’ या कादंबऱयांचे लेखन केले आहे. शिवाय ‘पाढ’ आणि ‘हूल’ हे दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.

‘पुळका’ ही नवीन कादंबरी एका अर्थाने मराठीतील अनन्यसाधारण कादंबरी ठरणार आहे. याचे कारण आशयाचं एक असं नवं, अस्पृष्ट दालन तिनं मराठीत खुलं केलं आहे. ज्याकडे आतापावेतो कुणाचे लक्ष गेले नाही. ‘कांकर’ या भटक्या विमुक्त जमातीवर लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे. लेखक हे दीर्घकाळ चित्रपट दिग्दर्शक म्हणून कार्यरत असल्याने या कादंबरीला त्यांनी एखाद्या चित्रपटासारखे दर्शनात्मक मूल्य प्राप्त करून दिले. तीन तासांचा एखादा चित्रपट आपल्या डोळय़ांसमोर उलगडत जावा तसे या कादंबरीचे आपल्याला ‘दर्शन’ होते.

नवनाथ गव्हाणे हा तिशीतला तरुण आहे. त्याला आपल्या करीयरचा भाग म्हणून डॉक्टरेट पदवीसाठी प्रबंध लेखन करावयाचे आहे. ‘कांकर’ या जमातीवर अद्याप कोणी काम केलेले नाही म्हणून नवनाथ पुण्याजवळ या जमातीची जी पालं आहेत तिथं पोहोचतो. पंधरा-वीस पालं आहेत. त्यात राहणारे हे ‘कांकर’ निरनिराळय़ा वस्तू, झाडू, वळलेली दोरी, काचेची भांडी, पायपोसणी, मसाले असं काही तयार करून विकणे हा त्यांचा पोट भरायचा धंदा आहे. नवनाथ येतो तेव्हा प्रत्येकाला ते आपल्याच वस्तू खरेदी करण्यासाठी आलेलं गिऱहाईक आहे असं वाटतं आणि नवनाथभोवती सगळे कांकर जमा होतात.

नवनाथला हवी असलेली कांकर जमातीविषयीची माहिती फकरू देतो. कांकर ही कर्नाटकातून महाराष्ट्रात विस्थापित झालेली जमात आहे. त्यांची सगळय़ांची आडनावं ‘कांकर’ हीच आहेत. भाषा कानडीमिश्रित. पहिल्या भेटीत नवनाथ त्यांचे फोटो काढतो. त्याचेही त्यांना खूप अप्रूप वाटते. दुसऱया भेटीत कांकरांविषयी पेपरमध्ये छापून आलेला त्याचा लेख आणि त्यात त्या सर्वांचा छापलेला फोटो तो दाखवतो. कांकरांना त्यात रस नसतो. प्रत्येकाला आपला मोठा, रंगीत फोटो हवा असतो.

नवनाथ त्या नंतरच्या खेपेस त्यांची एक सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांची प्रत्येकाची रेशन कार्डस् तयार करून घेऊया म्हणतो. त्यांच्या मुलांना शिकवण्याचा संकल्प जाहीर करतो. रेशनकार्ड मिळाल्यानंतरचा आनंद लेखकाने मोठा सुरेख चितारला आहे. रेशनकार्डवर खरोखरच स्वस्त दरातलं रॉकेल त्यांना मिळतं तेव्हा त्यांचा नवनाथवर विश्वास बसतो.

पुढच्यावेळी नवनाथ शरद पवार नावाच्या लिडरला घेऊन येतो. त्याच्या सहकार्याने कांकरांची संघटना बांधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कांकर एकता मंच, वगैरे, वगैरे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा नवनाथ प्रामाणिक समाजसेवक नाही तर तो संशोधक आहे.

कांकराबद्दलचा पुळका

संशोधनासाठी नवनाथने ही उपेक्षित आणि दुर्लक्षित जमात मुद्दाम निवडली. त्याच्यामुळे ती महाराष्ट्राला कळली असा त्याचा दावा आहे. कांकरबद्दलचा पुळका नेमका काय हे कादंबरी वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ती उत्सुकता लेखकाने चांगलीच वाढवलीय.

प्रस्तुत कादंबरीत मुमताज या लावण्यवतीचे महत्त्वाचे उपकथानक येतं. मुमताज प्रकरण हा एक स्वतंत्र कादंबरी विषय होऊ शकेल एवढय़ा शक्यता असणारं असलं तरी या कादंबरीशी ते सेंद्रिय एकात्मता साधणारं आहे.

या कादंबरीने सुरेश पाटोळे हे मराठीचे उभरते, महत्त्वाचे आणि यापुढे त्यांना दुर्लक्षून चालणार नाही असे कादंबरीकार आहेत हे सिद्ध केले आहे. कादंबरी वाचत असताना मुखपृष्ठावरील तपशील ठळक होत जातात इतकं तपशीलवार मुखपृष्ठ नावडकर बंधूंनी रेखाटलय.

यातले अनेक प्रसंग वाचता वाचता वाचकच कादंबरीकार होतो कारण लेखकाने आधी सोडलेले धागे विणत वाचक पुढे सरकतो नि वाचकाच्या मनातली विण लेखक पूर्ण करतो हे या कादंबरीचं यश म्हणावं लागेल. वातावरण निर्मिती हा जणू लेखकाचा हातखंडाच आहे. प्रत्येक प्रसंगानुरूप केलेली वातावरण निर्मिती सुरेख प्रकारे शब्दबद्ध केल्यामुळे शब्दातून दृश्य स्पष्ट करण्याची किमया साधणारा लेखक आजच्या पिढीत तरी विरळाच! त्यामुळे वेगवेगळय़ा जातींवर लिहू शकणारा दुसरा ताकदीचा कादंबरीकार मला दिसत नाही. जितक्या जातींवर ते लिहितात तितक्या भाषा त्यांना येतात ही एक आश्चर्य वाटायला लावणारी गोष्ट आहे.

राजदत्त, अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल म्हणाले होते की, त्यांच्या कादंबऱयांची पटकथा करताना फार काही करावे लागत नाही. पटकथेसारखेच त्यांचे लेखन असते. अण्णाभाऊंचा हा गुण सुरेश पाटोळे यांच्या लेखनात उतरला आहे. त्यामुळे त्यांच्या सगळय़ाच कादंबऱयांत चित्रपटांची बीजे आहेत. या अर्थाने सुरेश पाटोळे मला अण्णा भाऊंचे वाङ्मयीन वारस वाटतात. ‘पुळका’ ही कादंबरी त्याचा पुरावा म्हणता येईल.

पुळका

लेखक..सुरेश कृष्णाजी पाटोळे

प्रकाशक..यशोदीप पब्लिकेशन्स, (पुणे)

पृष्ठ..१७६, मूल्य..१८०

 

 

आपली प्रतिक्रिया द्या