पुणे तिथे काय उणे… पत्नीचा धाक अन् गमावले 50 लाख

1316

बायकोला राग येऊ नये म्हणून नवरा पुरेपुर प्रयत्न करत असतो. त्यासाठी सर्वस्व लावण्याची तयारी ठेवतो. त्यात मागे राहितील ते पुणेकर कसले… त्याचं झालं असं की पाच वर्षांपूर्वी प्रभात रस्तयावरील एकाच्या घरातून तब्बल 50 लाखांची रोकड आणि तीन तोळे सोने चोरीला गेले होते. मात्र, पत्नीच्या धाकापाई आणि तिला मानसिक त्रास होऊ नये नवऱ्याने फक्त 5 लाखांची रोकड चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी चोरट्याला दुसऱ्यांदा त्याच घरात चोरी करताना पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्याने संबंधित घरातून पाच वर्षांपूर्वी 50 लाखांसह दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. फिर्याद 5 लाखांची आणि कबुली 50 लाखांची होती. अखेर फिर्यादीलाच विचारल्यानंतर त्याने पत्नीसाठी कमी रकमेची चोरी झाल्याचे सांगताच पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला. सोमनाथ बंडू बनसोडे (वय 47, रा. वारजे माळवाडी) आणि सुधाकर मुरलीधर बनसोडे (वय 37, रा. मांजरी बुद्रूक) अशी अटक केलेल्या चुलतभावांची नावे आहेत.

प्रभात रस्त्यावरील ग्रीन सोसायटीमध्ये जेष्ठ महिलेवर चावूâने हल्ला करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमनाथला पोलिसांनी 30 जुलैला अटक केली. चौकशीत त्याने पाच वर्षांपुर्वी चुलतभाऊ सुधाकरच्या मदतीने त्याच घरातून जबरी चोरी करुन तब्बल 50 लाखांची रोकड आणि तीन तोळे सोन्याची चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता, त्यामध्ये फक्त 5 लाखांची चोरी झाल्याची फिर्याद होती. आरोपीकडून 50 लाखांची कबुली तर फिर्याद फक्त 5 लाखांची असल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. त्यामुळे फिर्यादीला बोलावून घेत माहिती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबर 2015 मध्ये घरातून 50 लाखांची रोकड आणि दागिने चोरी झाले होते. मात्र, चोरी झालेली खरी रक्कम पत्नीला सांगितल्यास तिला मानसिक धक्का बसला असता. त्यामुळे मी फक्त 5 लाखांच्या ऐवजाची चोरी झाल्याची फिर्याद दिल्याचे सांगितले. हे ऐकताच पोलिसांनी डोक्यावर हात मारुन घेतला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही चुलतभावांना अटक करुन तब्बल 63 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, हरिश्चंद्र केंजळे, संजय शिंदे, धोडोपंत पांचाळ, विजय चिरमे, सचिन चव्हाण, बाळासाहेब भांगले, प्रवीण कांचन यांच्या पथकाने केली.

आरोपी चुलत भावंडाचा गुंतवणूकीचा अनोखा फंडा

सोमनाथ आणि सुधाकर या चुलत भावडांनी गिरमीटच्या साह्याने घराचे कुलूप तोडून 63 लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. त्यानंतर मुख्य आरोपी सुधाकरने चोरीच्या पैशातून एक गुंठा जागेतील 800 स्क्वेअर फूट बांधकाम असलेले 20 लाखांचे घर खरेदी केले होते. त्याशिवाय 5 लाख 50 हजांराची मोटार, 81 हजारांची दुचाकी घेत गुंतवूणक केली होती. दुसरा आरोपी सोमनाथने भूगाव येथे वन बीएचके फ्लॅट खरेदी करुन त्यामध्ये फर्निचर ग्रीलची कामे केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या