कैद्यांच्या मुलाची शाळेची फी भरणारे पुणेकर वकील

संतोष आंधळे

कोरोनाच्या या वैश्विक महामारीचा परिणाम शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांवर झाला असल्याचे दिसून आले आहे. या कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे त्यांना शाळेची फी भरता आलेली नाही. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवले आहे. या अशा परिस्थितीत कात्रजमध्ये राहणाऱया दहावीच्या मुलाचे शिक्षण पुढे कायम राहावे याकरिता पुण्यातील वकिलांनी त्याची फी भरली आहे. विशेष म्हणजे या मुलांच्या वडिलांना वेगवेगळ्या 21 चोरीच्या गुन्ह्यांत एकत्रित अशी 28 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या वकिलांनी कैद्यांचा हा मुलगा अभ्यासात आणि खेळात हुशार असल्याची माहिती काढून ही फी भरली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीही अशाच 30-40 विद्यार्थ्यांची फी वकिलांनी भरली आहे.

पुणे येथील सहकार नगरमध्ये राहणारे वकील यशपाल पुरोहित (30) गेली साडेतीन वर्षे जिल्हा न्याय सेवा प्राधिकरण येथे कार्यरत असून ज्या कैद्यांना वकील मिळत नाही अशा कैद्याची न्यायालयात बाजू मांडण्याचे काम करीत आहेत. या साडेतीन वर्षांत त्यांना अनेक पैदी असे भेटले आहेत की, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार हा त्यांना सातत्याने प्रश्न पडायचा. यातूनच त्यांनी कैद्याच्या मुलांची शाळेची फी भरायचा निर्णय घेतला. सर्वच कैद्यांची मुले ही खासगी शाळेत नसतात. अनेक विद्यार्थ्यांची फी 2-5 हजार रुपयांत असते अशा विद्यार्थ्यांची फी ते भरत आहेत.

कात्रज येथील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अधिक माहिती देताना पुरोहित सांगतात की, ‘हा विद्यार्थी नववी पास होऊन दहावीत गेला होता. तो खासगी शाळेत शिक्षण घेत आहे, मात्र नववीची आणि दहावीची पहिल्या सत्राची फी बाकी होती. त्यामुळे त्याचे पुढचे शिक्षण अडचणीत आले. त्याचे वडील हे 2018 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांच्या न्यायालयीन कामकाजासाठी मी मदत करत आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीला माझा नंबर देऊन ठेवला होता. त्याच्या पत्नीचा मला त्याच्या मुलाच्या फीसाठी फोन आला होता. गेल्या वर्षीपर्यंत त्या काम करत होत्या, मात्र कोरोना काळात नोकरी गेली म्हणून मुलाचे शिक्षण अडचणीत आल्याचे मला सांगितले. मी ही माहिती माझे काही मित्र वकील आहेत त्यांना सांगितली. आम्ही शाळेतून त्या विद्यार्थ्यांची माहिती काढली. तो हुशार असल्याचे कळले आणि खेळात तो चांगला असल्याने त्याला पाच हजार रुपयांची फी सवलत देण्यात आली होती. मात्र 16 हजार रुपये फी भरणे बाकी होते. ते मी माझे पुणे येथील वकील मित्र आणि सहकारी सिद्धार्थ आणि वर्षा पावगी, प्रिया पायगुडे, चिन्मय अक्कडकर यांनी मिळून ते भरले. ही मुले या अशा परिस्थितीत शिकणे फार गरजेचे आहे.’

‘कोरोनाच्या या काळात अनेक कैद्यांच्या मुलांची शाळेची फी न भरल्यामुळे शिक्षण अडचणीत आले होते. मला जे काही शक्य आहे ती फी आम्ही भरतो. मला वर्षभरात जिल्हा न्याय सेवा प्राधिकरणाच्या कामातून तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात. त्यापैकी सर्व पैसे या मुलांच्या शिक्षणावर आणि काही पैदी असतात ते सुटून आल्यावर त्यांना काही गोष्टी लागतात त्यावर खर्च करतो.’

पुरोहित यापुढेही ज्या कैद्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर मित्राच्या सहकार्याने मदत करत असतात. त्यांनी याकरिता त्याच्या मित्रांचा ग्रुप तयार केला आहे. त्यांच्या मते कैद्याची मुले चुकीच्या रस्त्याला जाता कामा नये. आज त्यांना कुणीतरी शिक्षणासाठी मदत करत आहे, भविष्यात ते कुणाला तरी मदत करू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या