विमानाने बाहेरून पुण्यात येण्यासाठी एक-दोन तासांचा कालावधी लागत असताना विमानतळातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना एक ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. बाहेरून येणाऱ्या विमानांना पार्किंग-बे उशिरा मिळत असल्याने विमान थांबवण्यात येते. त्यानंतर खाली उतरल्यानंतर एरोमॉलमध्ये प्रवाशांना कॅबची प्रतीक्षा एरोमॉलमधून बाहेर पडण्यासाठी अर्धा-एक तास लागतो.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुमारे 120 कोटी रुपये निधी खर्च करून मल्टिलेव्हल कार पार्किंग (एरोमॉल) उभारले आहे. एक हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता असलेल्या या एरोमॉलमध्ये प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. टर्मिनलमधून बाहेर पडल्यानंतर प्रवासी पादचारी पुलावरून एरोमॉलच्या दुसऱ्या मजल्यावर येतात. तेथून कॅबची सोय उपलब्ध आहे. मात्र, बॅगा, लहान मुलांना घेऊन आलेल्या प्रवाशांना कॅब बुक करण्यासाठी वाट पाहत थांबावे लागते. कॅब बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने कोंडी होते. टर्मिनलमध्ये प्रवाशांना अनेक पायाभूत सुविधा मिळत नाहीत, तशीच स्थिती एरोमॉलमध्येही असल्याने विमानतळ प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. विमानतळ प्रशासनाचे एरोमॉलपेक्षा भाडेतत्त्वावर व्यावसायिक वापरासाठी दिलेल्या जागांवर आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांना मात्र वेठीस धरले जात आहे. त्यामुळे प्रवासाला वेळ कमी आणि घरी पोहोचायला दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
या आहेत समस्या…
■ रिक्षा, कॅब एकाच ठिकाणी असल्याने वाहतूककोंडी होते. कॅबचालकांचा नकार. जवळचे बुकिंग घेण्यास बसण्याची सुविधा नाही.
■ महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना उभे राहावे लागते. कॅबची सेवा एकाच मजल्यावरून आहे. स्थानिकपेक्षा बाहेरील कॅबचालकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात. कॅब बुक केल्यानंतर किमान 30 मिनिटे वाट पाहावी लागते.