उसाचा ट्रक व स्कॉर्पिओ गाडीची समोरासमोर धडक, खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावच्या हद्दीत अवसरी फाटा ते पारगाव रस्त्यावर उजव्या कालव्याजवळ रविवार दिनांक 19 रोजी संध्याकाळी उसाचा ट्रक व स्कॉर्पिओ गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी स्कार्पिओ गाडीत प्रवास करत होते.

प्राजक्ता प्रदीप ठाकूर (वय 27), ज्ञानदा प्रदीप ठाकूर (वय 3 सर्व रा.ठाकूर पिंपरी ता.खेड), चालक संतोष सोपान पवार (वय 40), अपर्णा संतोष पवार (वय 36), अदिती संतोष पवार (वय 10 सर्व रा.निघोजे ता.खेड) अशी जखमींची नावे आहेत.

गाडीतील प्रवासी पिंपळगाव खडकी येथील त्यांच्या जवळचे नातेवाईक सेवानिवृत्त ज्ञायाधीश देवराम अरगडे यांच्याकडे गेले होते. पाहुणचार घेतल्यानंतर ते स्कार्पिओ गाडीतून (एम.एच 14 डी.एन 8556) निघोजे गावाकडे जात होते. त्याचवेळी पश्चिम बाजूने ऊस वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.04 एफ 7725) समोरून आला. यावेळी दोन्ही वाहनांची समरसमोर धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात स्थळापासून जवळच राहणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवराज भोर, संदीप भोर, बाळासाहेब भोर, गौरव भोर, अर्जुन काजळे, विलास काळे, विकास भोर मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना मंचर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गणेश शिंदे व गौरव बारणे ह्या रुग्णवाहिका चालकांनी दाखल केले आहे. पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. भोरमळ्यातून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केली असून मंचर पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.