पुणे: बेकरीला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

141180

सामना ऑनलाईन । पुणे

लाईक कराट्विट करा

पहाटेच्या साखर झोपेत असताना बेकरीत झोपलेल्या सहा कामगारांची ती काळरात्र ठरली. शाँर्ट सर्कीटने दुकानात आग लागल्यानंतर पोटमाळ्यावर झोपलेल्या कामगारांना जाग आली, खाली उतरून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. आरडाओरड केली, पण मालकाने बाहेरून कुलूप लावल्याने त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. दुकानात खाली आग, पोटमाळ्यावर सर्वत्र धुर अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या कामगारांनी तडफडून एकमेकांना मिठी मारून प्राण सोडले. ही ह्रदयद्रावक घटना कोंढव्यात घडली.

ईर्शाद खान (वय २६), शानू अन्सारी (वय २२), जाकीर अन्सारी (वय २४), फहिम अन्सारी (वय २१), जुनेद अन्सारी (वय २५), जिशान अन्सारी (वय २१, सर्व मुळ रा. बिजनौर, उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अब्दुल मोहम्मद युसूफ चिन्नीवार (वय २७, कुमार होम्स, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे बेकरी मालकाचे नाव आहे.

कोंढव्यात तालाब मशिदीसमोर गगन अव्हेन्यूव नावाच्या सोसायटीत “बेक्स अॅण्ड केक्स” ही बेकरी आहे. तेथील कामगार दिवसभर काम करून तेथेच झोपतात. रोजच्याप्रमाणे काम संपल्यानंतर मालकाने बेकरीला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर सहा कामगार पोटमाळ्यावर जाऊन झोपले. पहाटे सव्वा चारच्या सुमारास बेकरीत शाँर्ट सर्कीटने आग लागली, त्यानंतर कामगारांना जाग आली. त्यांनी बाहेर पडण्यासाठी खटाटोप सुरू केला. पण बाहेर पडता येत नव्हते. दुकानातून धुर येताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला वर्दी दिली. अग्नीशमन दलाचे पथक, रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले. बेकरीचे कुलूप तोडून शटर उघडून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली, दरम्यान पोटमाळ्यावर गेल्यानंतर तेथे सहा जण एकमेकांना घट्ट पकडून बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे धक्कादायक दृश्य अग्नीशमन दलाच्या जवानांनी पाहिले. कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या