पुणे- हळदी-कुंकवाचा कार्यक्रम भाजप नगरसेविकेच्या अंगलट, कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांच्या परवानगीशिवाय हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या अंगलट आला आहे. कोरोना नियमावलीचे पालन न करता 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवून कार्यक्रम घेतल्याप्रकरणी भाजपच्या विद्यमान नगरसेविकेसह माजी नगरसेविका आणि एकाविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारीला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, विष्णू आप्पा हरिहर आणि निर्मल मोतीलाल हरिहर (सर्व. रा. गुरूवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई दीनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित कार्यक्रमाची परवानगी न घेता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांनी महात्मा फुले वाडा परिसरातील रस्त्यावर 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमविली. त्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून तिळगूळ वाटप आणि भेटवस्तूचे वितरण केले. कोरोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस तपास करीत आहेत.

कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्षांची हजेरी

प्रभागात नगरसेविकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या