सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

54

सामना ऑनलाईन । पुणे

बेदरकारपणे गाडी चालवून पाचजणांना उडवणाऱ्या सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सुजाताचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. याआधी अपघात प्रकरणी सुजातावर जामीन मिळेल अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पाचजणांना उडवूनही सुजाताला सहजतेने जामीन मिळाला होता.

रस्ता ओलांडण्यासाठी वाहतुकीचा वेग मंदावण्याची प्रतीक्षा करीत बाणेर गावाच्या कमानीजवळ दुभाजकावर उभ्या असलेल्या पाचजणांना बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या सुजाताने उडवले होते. या अपघातात पूजा अजयकुमार विश्वकर्मा (२४) आणि तिची मुलगी ईशा (३) यांचा मृत्यू झाला होता तर निशा शेख (४), शाजिद शेख (४) आणि सय्यद अली (२५) हे तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणात चतुःश्रृंगी पोलिसांनी निष्काळजीपणे कार चालवून अपघात केल्याप्रकरणी सुजाता श्रॉफला मंगळवारी (१८ एप्रिल) सकाळी अटक केली. तिला मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि झालेला तपास याची माहिती घेतल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून सुजाताची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या