पुणे – सोशल मीडियावर कुख्यात गुंडाचे उदात्तीकरण करणारे पोलिसांच्या रडारवर

gajanan-marane

सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याच्यासह साथीदारांविरूद्ध आणि कमेंट करणाऱ्यांविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे फरार झालेल्या गजानन मारणेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणे आणि समर्थकांनी मोटारीतून मिरवणूक काढली होती. त्यानंतर त्यांनी विरोधी टोळीसह जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक व्हिडीओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल केले. गजानन मारणेविरूद्ध आणखी 7 गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे संबंधित केसमधील साक्षीदार आणि तक्रारदारांच्या मनात भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. मारणेसह समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी गुन्हेगारी स्वरूपाचे मत व प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओला युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर बेकायदेशीर कमेंट करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर कमेंट करणारे रडारवर

गुन्हेगारी प्रवृत्तीचे सोशल मीडियावर उदात्तीकरण करणाऱ्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधितांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नागरिकांनो कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्हिडीओला कमेंट करण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या