पुणं तिथं काय उण… चितळेंची बाकरवडी आली की हो दारी

478

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. फळ, भाजी,औषधं या जीवनावश्यक गोष्टी या काळात उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या घेण्यासाठी आम्ही बाहेर नाही पडणार, आम्हाला आमचा कम्फर्ट जास्त महत्वाचा आहे असं म्हणाऱ्या पुणेकरांसाठी आता चितळे आपल्या दारी आले आहेत. पुण्याच्या कोथरूड भागातल्या वूड लँड सोसायटीत बघता बघता अवघ्या तीन तासात चितळेंची बाकरवडी, आम्रखंड, पेढे, बर्फी असं सारं काही फस्त झालं. म्हणतात ना ‘पुणं तिथं काय उण’ हे खरं ठरवत, लॉक डाऊनचे आणि सोशल डिस्टसिंग चे पालन करीत पुणेकरांनी असाही आदर्श दाखवून दिला.

chitale-bandhu-society

कोथरूड परीसरातल्या वूड लँड सोसायटीत 500 फ्लॅट आहे. त्यात जवळपास 150 फ्लॅटमध्ये जेष्ठ नागरिक राहतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण लॉक डाऊन काळात सोसायटीत राहणाऱ्या मानसी धोत्रे यांनी येथील नागरिकांना भाजीपाला, फळं, मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यातूनच चितळे यांची उत्पादने मिळतील का अशी विचारणा त्यांच्याकडे काही नागरिकांनी केली. त्यांनी चितळे मिठाईवाले यांना फोन केला. चितळे यांनी आम्ही आमची उत्पादने जी पाकिटात उपलब्ध असतील अशी सर्व आपल्या सोसायटीत उपलब्ध करून देतो असे धोत्रे यांना सांगितले. त्यानुसार धोत्रे यांनी आपल्या सोसायटीच्या कमिटी ग्रुपवर संदेश दिला. दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी चितळे सोसायटीत हजर झाले. त्यासाठी सोसायटीत अगोदर जागेची पाहाणी करण्यात आली. सोशल डिस्टसिंग विचारात घेऊन अगोदर जेष्ठ नागरिक, त्यानंतर मध्यम वयातील व्यक्ती यांना अंतर ठेऊन त्यांनी केलेल्या यादीनुसार पदार्थ देण्यात आले.

मानसी धोत्रे म्हणाल्या, आमच्या सोसायटीतल्या लोकांनामनापासून बाहेर पडायचं नाही. शिवाय त्यांना सर्व काही सोसायटीत उपलब्ध झाल्याने बाहेर पडण्याची गरजच वाटत नाही. चितळे यांची उत्पादने सर्वांना आवडतात. त्यासाठी एक स्वंयसेवक या भावनेतून भाजी, फळं, दीनानाथ हॉस्पिटलकडून मेडिकल सुविधा देतानाच चितळेचे पदार्थ उपलब्ध करून दिले. दर पंधरा दिवसांनी चितळेंचे पदार्थ उपलब्ध होतील. चितळे यांनी स्वतः चे चार कर्मचारी, दोन व्हॅन मधून सर्व पदार्थ उपलब्ध करून दिले. सोसायटीत आठवड्यातून एकदा एटीएम सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या