धक्कादायक; कर्मचाऱ्याला मारहाण करून गुप्तांगामध्ये केला सॅनिटायझर स्प्रे

682
crime

लॉकडाऊनमध्ये दिल्लीत अडकल्यानंतर कंपनीच्या खर्च केलेल्या पैशांची मागणी करत मालकासह तिघांनी व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पाय धुतलेले पाणी पिण्यास लावण्याबरोबरच गुप्तांगावर सॅनिटायझर स्प्रे करुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी एका 30 वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे कोथरुडमधील पुणे आर्ट फेस्टिव्हल कंपनीमध्ये पाच महिन्यापासुन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कार्यालयीन कामासाठी ते मार्च महिन्यात दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी लॉकडाऊनमुळे ते दिल्लीत अडकल्यामुळे जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांनी मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादी यांनी कंपनीचा लॅपटॉप हॉटेलमध्ये तारण ठेवला. पुण्यात आल्यानंतरही हॉटेलमध्ये राहावे लागल्याने तेथेही त्यांनी कंपनीचा मोबाईल व क्रेडिट कार्ड तारण ठेवले होते. त्यानंतर 13 जूनला फिर्यादी त्यांच्या मित्रासमवेत घोटावडे फाटा येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कंपनीचा मालक गणेश केंजळे, त्याचा ड्रायव्हर वैभव साबळे यांनी फिर्यादीस मोटारीत जबरदस्तीने बसवून त्यांच्या कार्यालयात नेले. तेथे केंजळे, सागर शिंदे यांनी फिर्यादीस दांडक्याने मारहाण केली. चिखलाने माखलेले पाय धुण्यास सांगून तेच पाणी पिण्यास भाग पाडले. तर साबळेने स्प्रेद्वारे फिर्यादी तरुणाच्या गुप्तांगावर मारले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी सुटका करुन घेत कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तरुणावर सध्या खासगी रुग्णलयात उपचार सुरु असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या