लस घ्या, बाकरवडी न्या! लसीकरण वाढवण्यासाठी चितळे बंधूंची भन्नाट शक्कल

राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची आकडेवारी पाहता लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पुण्यात चितळे बंधूंनी अनोखी शक्कल लढवली आहे. ‘लस घ्या अन् बाकरवडी घेऊन जा’ अशी ऑफरच देण्यात आली आहे.

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या माध्यमातून चितळे बंधू हा उपक्रम राबवत आहेत. आठवडाभरात बाकरवडीच्या 15 हजार पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र या ऑफरसाठी कोणतेही लसीकरण केंद्र ठरवण्यात आले नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी पुण्यातील विविध केंद्रांवर लसीकरण करून घेतलेल्या प्रत्येकाला चितळेंच्या बाकरवडीचे प्रत्येकी 50 ग्रॅमचे पॅकेट मोफत देण्यात आले. एका दिवसात अशी पाच हजार पाकिटे मोफत वाटण्यात आली आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पुणे शहर आणि जिह्यात काल 85 हजार नागरिकांनी लस घेतली. देशात एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काही लोकांना बाकरवडीची पाकिटे वाटणार आहोत. आम्ही ठराविक एखाद्या केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही. वेगवेगळ्या केंद्रांवर आमचे स्वयंसेवक पाकिटांचे वाटप करतील. कारण केंद्र जाहीर केल्यास तेथे गर्दी होऊ शकते. – संजय चितळे (संचालक, चितळे बंधू मिठाईवाले )

आपली प्रतिक्रिया द्या