पुण्यातील महिला डॉक्टर विनयभंग प्रकरणात मोठे गौडबंगाल, दोन्ही आरोपी फरार

>> नवनाथ शिंदे

शिवाजीनगर जम्बो कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा दोन सहकारी डॉक्टरांनी शारीरिक आणि मानसीक छळ करीत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. हा प्रकार एक महिन्यापासून सुरू होता, संबधीत युवतीने तक्रार करताच दोन्ही आरोपी पुण्यातून फरार झाले आहेत. घटनेचा तपास एका महिला अधिकाऱ्याकडे आहे. मात्र, दोन्ही आरोपी एका उच्चभ्रू कुटुंबातील असल्यामुळे पोलिसांबरोबरच इतर काही प्रशासकीय अधिकारी देखील या प्रकरणामध्ये ‘जातीने लक्ष’ घालत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

डॉ. योगेश भानूशाली उर्फ भद्रा आणि डॉ अजय बागलकोट (दोघेही नेमणूक जम्बो कोविड सेंटर, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेमुळे जम्बो कोविड रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली आहे. संबंधित दोन्ही डॉक्टरांकडून महिला डॉक्टरचा तब्बल महिन्याभरापासून छेडछाडीला सामोरे जावे लागले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर मूळची मुंबईची असून एका कंपनीच्यावतीने जम्बो कोविड रुग्णालयात कार्यरत आहे. तिच्यासोबत डॉ. योगेश आणि डॉ. अजय हे दोघेही कामाला आहेत. फिर्यादी महिला डॉक्टर जम्बो रुग्णालयात कामाला असताना डॉ. योगेश आणि डॉ. अजय 29 ऑगस्टपासून तिला त्रास देत होते. मागील महिन्याभरापासून महिला डॉक्टर मनस्ताप करीत होती. कंपनीनेही दखल न घेतल्यामुळे तिने पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर महिलेला न्याय मिळणे अपेक्षित होते. परंतु, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांची मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी अवस्था झाली आहे. प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीची साधी चौकशी केली गेली नाही. संबंधित एक डॉक्टर एका उच्चपदस्थ अधिकारयाचा मुलगा असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी तपासी अधिकारी मनीषा झेंडे यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

दोघांनी डॉक्टरी पेशाला फासला काळिमा

जम्बो रुग्णालयात दोन डॉक्टरांनी प्रोफेशनलाच काळीमा फासला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, दोघेही डॉक्टर आरोपी कामाच्या ठिकाणी तिला स्पर्श होईल, अशा पद्धतीने दोघेही चालत होते. येता जाता तिला अश्लिल टोमणे मारायचे. तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपीनी तिचा आणखी छळ करायला सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे ही महिला डॉक्टर वास्तव्याला असलेल्या हॉटेलमध्ये एकटी असताना मेरे खिलाफ कम्पलेंन्ट करती है क्या, तेरी इज्जत उतारकर दिखाता हूं, असे म्हणत डॉ. योगेशने महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. त्याशिवाय डॉ अजयने तिच्याकडे धमकावून शरीरसुखाची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या