घातक बुरशीचा मणक्यावर हल्ला, कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णांना त्रास

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काळ्या बुरशीची लागण होत होती. आता रुग्णांना कोरोना झाल्यानंतर एक प्रकारची बुरशी त्यांच्या मणक्यावर हल्ला करत आहे. पुण्यात अशा प्रकारचे चार रुग्ण अढळले आहेत. नवी बुरशी आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोरोनातुन बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना अस्वस्थ वाटत होते. या रुग्णांची एमआरआय चाचणी केल्यानंतर मणक्याखाली या बुरशीचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.  या बुरशीमुळे हाडांना इजा पोहोचत आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या आजाराला एस्परगिलस ऑस्टियोमाइलाइटिस म्हणतात. अशा प्रकारच्या आजाराचे निदान करणे फार कठीण असते. अशा प्रकारची बुरशी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आढळतो. ही बुरशी फुफ्फुसांमध्ये आढळण्याचे प्रमाण फार कमी आहे.

ज्या रुग्णांना या बुरशीची लागण झाली होती त्यांना न्युमोनिया आणि कोविडसंबंधित आजारांसाठी औषधं देण्यात आली होती. त्यापैकी कॉर्टिकोस्टेरॉइड्स या औषधाचा अतिवापर केल्याने या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

तीन महिन्यांपूर्वी एस्परगिलस वर्टेब्रल ऑस्टियोमाइलाइटिस या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आणखी तीन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या