बँक खात्यामध्ये फेरफार करून पैसे लाटणाऱ्या दोन मॅनेजरांना अटक

जेष्ठ बँक खातेदाराच्या मृत्युनंतर त्यांच्या बँक खात्यातील सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम बँकेतील दोन मॅनेजरांनी संगनमताने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील इंडसंड बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली. जुबेर गांधी (वय 34, रा. विमाननगर), अंकीता रंजन (वय 30, रा. विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन (रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

राजगोपालन यांच्या वडीलांचे विमाननगर येथील इंडसंड बँकेमध्ये बचत खाते आहे. त्यांचे वडील आजारी असल्याने बँकेच्या रिलेशनशीप मॅनेजर अंकीता रंजन व शाखा व्यवस्थापक जुबेर गांधी हे राजगोलालन यांच्या घरी जाऊन बँक व्यवहार करण्यासाठी आवश्यक मदत करीत होते. 10 मार्चला राजगोपालन यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर 22 मार्चला फिर्यादी चंद्रशेखर यांच्या मोबाईलवर निपॉन इंडिया म्युच्युअल फंड प्रा.लि. या कंपनीचा मेसेज आला. त्यामध्ये खातेदाराची सही बनावट असल्याने व्यवहार पुर्ण करता येणार नाही, असे नमूद केले होते. त्या मेसेजमुळे चंद्रशेखर यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन संबंधीत अधिकाऱ्यांना मेसेज दाखविला. वडीलांचे निधन झाल्यानंतर असा मेसेज कसा येऊ शकतो, अशी विचारणा केली. त्याशिवाय त्यांनी वडीलांच्या बँक खात्याची सविस्तर माहिती घेतली असता, त्यामध्ये 4 हजार 596 रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.

वडिलांची मुदत ठेव बंद करण्याकरीता कोणीतरी बनावट सह्या करुन 24 मार्चला बँक खात्यातुन 2 लाख 37 हजार रुपये कोणीतरी काढून घेतल्याचे चंद्रशेखर यांच्या निदर्शनास आले. आरोपींनी बँक खात्याच्या केवायसीमध्ये बदल करण्याकरीता मुळ मोबाईल क्रमांकामध्ये बदल केला होता. त्याशिवाय बँकेत झालेल्या व्यवहाराची माहिती मिळू नये, यासाठी आरोपींनी दुसऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. निपॉन इंडिया म्युच्युअल फंड प्रा.लि. या कंपनीकडे सादर केलेला अर्ज चंद्रशेखर यांच्या वडीलांच्या निधनानंतर करण्यात आला होता. हा सर्व प्रकार इंडसंड बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँकेतील अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन केला असल्याची फिर्याद विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी इंडसंड बँकेच्या गांधी व रंजन यांना अटक केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सचिन जाधव तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या