भीमा नदीपात्रात आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा, संशयातून भावडांनी मिळून घडविले हत्याकांड

अपघातात ठार झालेल्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयातून नात्यातील पाचजणांनी मिळून संपूर्ण कुटुंबीय ठार केल्याचे उघडकीस आले आहे. पारगाव भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह यवत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. संबंधित कुटुंबियांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे उपस्थित होते.

अशोक कल्याण पवार (39), शाम कल्याण पवार (35), शंकर कल्याण पवार (37), प्रकाश कल्याण पवार (24), कांताबाई सर्जेराव जाधव (45, सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहन उत्तम पवार (45), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (40, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), शाम पंडित फलवरे (28), मुलगी राणी शाम फलवरे (24), रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (7), शाम फलवरे (5) आणि कृष्णा शाम फलवरे (3, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी खून केल्याल्यांची नावे आहेत.

आरोपी अशोक पवार आणि मोहन पवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. मोहन हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातील असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. काही महिन्यांपूर्वी मोहनचा मुलगा अनिल आणि अशोकचा मुलगा धनंजय दुचाकीवरून प्रवास करीत होते. वाघोलीजवळ अपघातात धनंजय गंभीररित्या जखमी झाला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी झालेल्या अपघातास आणि मुलाच्या मृत्यूला मोहनचे कुटूंबिय जबाबदार असल्याचा राग अशोकच्या मनामध्ये होता. त्याचा बदला घेण्यासाठी अशोकने इतर भावडांसह बहिणीच्या मदतीने मोहनचे कुटुंबीय ठार करण्याचा डाव रचला. त्यानंतर हल्लेखोरांनी मोहन पवार यांच्यासह सातजणांचा खून केला.

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सातही मृतदेह भीमा नदीपात्रात टाकून दिले. त्यानंतर घटनास्थळाहून पसार झाले होते. दरम्यान 18 ते 23 जानेवारीदरम्यान भीमा नदीपात्रात 7 मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी यवत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास करीत मृतदेहांची ओळख पटवित पाच आरोपींना अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एपीआय गणेश जगदाळे, एपीआय शिवाजी ननवरे, एपीआय संजय नागरगोजे, तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, सचिन घाडगे, राजु मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, निलेश शिंदे, धिरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडु विरकर, अक्षय सुपे, निलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड यांनी केली.

पोलीस अधीक्षकांचा वॉच
भीमा नदीपात्रात एकापाठोपाठ मृतदेह आढळून येत होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेसह यवत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम केले. त्यानंतर कुटुंबियांनी आत्महत्या नव्हे, तर त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. घटनेच्या दिवसापासून आरोपींना अटक करेपर्यंत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी प्रकरणात सातत्याने लक्ष ठेवले.

भीमानदी पात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधितांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी कुटुंबियांच्या नात्यातील पाचजणांना अटक केली आहे. आणखी तपास सुरू असून सातजणांचे खून कोठे करण्यात आले, खुनामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
– अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण