
जमाबंदी आदेश असतानाही सार्वजनिक रस्त्यावर गर्दी जमवून केक कापल्या प्रकरणी गजा मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणे त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय त्याच्या सात ते आठ साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला होता.
समर्थ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे रात्र गस्तीवर असताना रास्ता पेठेतील इंग्लिश मीडियम स्कूल जवळ घाबरलेल्या अवस्थेत एक तरुण आला. त्याने गुंड रुपेश मारणे हा साथीदारासोबत रस्त्यावर केक कापत असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता मारणे हा त्याच्या साथीदारासोबत केक कापत असल्याचे दिसून आले. परंतु पोलिसांना त्याचे सर्व साथीदार पळून गेले. पोलिसांनी त्याचा पाठलागही केला परंतु हे सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले.
त्यानंतर गुंड रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे तपास करत आहे