कुत्रा भुंकल्यावरून महिलेला मारहाण, कुटूंबियाविरोधात गुन्हा

कुत्रा भुंकल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागातील म्हातोबानगर परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजाराम मारूती चौधरी, मालूबाई मारूती चौधरी, बायडा राजाराम चौधरी, मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला आणि चौधरी शेजारी आहेत. काही महिन्यांपूर्वी तक्रारदार महिलेने एका भटक्या कुत्र्याला खायला दिले होते. त्यानंतर संबंधित कुत्रा मालूबाई चौधरी यांच्यावर भुंकल्याने चौधरी आणि तक्रारदार महिलेत वाद झाले. वादातून कुटूंबातील चौघा आरोपींनी महिलेला मारहाण केली होती. त्यानंतर महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्जाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने अर्जाद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या