
पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव लोणी काळभोर पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून दोन पालघन, मिरची पूड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तू मिळून आल्या. आरोपी कुंजीरवाडी येथील ॲटोकॉर्नर एच.पी. पेट्रोलपंप या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली त्यांनी दिली.
प्रेम राजु लोंढे (19, रा. आळंदी रोड, मुळ रा. जामखेड, गोरोबा थिएटर जवळ, नगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (26, रा. पानमळा रोड, मूळ रा. बाबळगाव जि. बीड), गणेश भगवान खलसे (22, रा. माळवाडी कुंजीरवाडी), तानाजी भाऊसाहेब गावडे (23, रा. माळवाडी कुंजीरवाडी ता. हवेली), अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कुंजीरवाडी परिसरात पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाली. म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे जवळ हत्यारासह दरोडेखोर थांबले असून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत, असे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच पाच ते सहाजण त्या ठिकाणाहून पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. काही आरोपी अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, शहर, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तात्रय चव्हाण पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, उपनिरीक्षक वैभव मोरे, नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दीपक सोनवणे, बाजीराव वीर, भगत, आडके, विश्रांती फणसे यांनी केली आहे.