चोरट्याकडून 27 चोरीचे मोबाईल जप्त, कोथरूड पोलिसांची कामगिरी

नागरिकांशी बोलण्याचा बहाणा करून त्यांना बोलण्यामध्ये गुंतविल्यानंतर जबरदस्तीने मोबाईल हिसकवणार्‍या आरोपीला कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. आरोपीकडून तब्बल 27 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. शहरातील विविध भागातून त्याने हे मोबाईल चोरले आहेत.

राहुल राजकुमार वसनानी (35, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते. डुक्कर खिंड भागात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी हे आपल्या स्टाफसह नाकाबंदी करीत असताना दुचाकीवरून आलेला वसनानी हा पळून जावू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एका पाउचमध्ये तब्बल 30 सिमकार्ड, पाच मेमरी कार्ड व वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन मिळून आले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्याने शहरातील विविध भागातून हे मोबाईल चोरल्याचे समोर आले. फोन करायचा आहे, या बहाण्याने पादचारी व्यक्तीकडून घेतलेला मोबाईल हिसकावून नेणे, नोकरी देण्याचे सांगून स्वतःचा नंबर सेव्ह करून देण्याच्या बहाण्याने घेतलेला मोबाईल हिसकावून नेल्याचे त्याने कबूल केले आहे.

आरोपी वसनानी याच्याकडून कोथरूड पोलिसांनी चोरीचे 27 मोबाईल, सिम कार्ड, दुचाकी असा तब्बल 2 लाख 1 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलीस आयुक्त रुक्मिनी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, मनोज पवार, संजय दहीभाते, शरद राऊत यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.