वारजेतील सराईत गंग्या आखाडे टोळीविरुद्ध मोक्का, पोलीस आयुक्तांकडून मोक्काचा बडगा कायम

वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गंग्या आखाडे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 108वी कारवाई आहे. त्यामुळे सराईतांचे कंबरडे मोडले असून बहुतांश गुन्हेगारी टोळ्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांमधील दहशत कमी झाली आहे.

टोळी प्रमुख गंग्या ऊर्फ विकी विष्णू आखाडे (24, रा. वारजे माळवाडी) चैतन्य रुक्मीदास ढाले (18, रा. पर्वती ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

वारजे माळवाडी परिसरात सराईत गंग्या आखाडे याने साथीदारांच्या मदतीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शस्त्र जवळ बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी कारवाई करूनही वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षव दगडू हाके यांनी टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक मनोज बागल, सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, प्रियांका कोल्हे यांनी केली.

11 महिन्यांत 45 टोळ्याविरुद्ध मोक्का
शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार, आतापर्यंत 108 टोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे. मागील 11 महिन्यांत तब्बल 45 टोळ्यांतील शेकडो सराईत जेरबंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. मोक्का कारवाई अशीच सुरू ठेवणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले आहे.