धक्कादायक; तिसरीही मुलगीच झाल्याने वैतागलेल्या आईने चिमुरडीला पाण्यात बुडवून ठार मारले

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तिसरीही मुलगी झाल्यामुळे जन्मदात्या आईनेच सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक गावात 25 नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी दिपाली संजय झगडे (या महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली झगडे ही दोन महिन्यांपूर्वी माहेरी बाळंतपणासाठी गेली होती. सव्वा महिन्यापूर्वी तिला मुलगी झाली होती. दीपालीला आधीही दोन मुली होत्या आणि तिसरीही मुलगीच झाल्याने ती नैराश्यात गेली होती. यातून तिने 25 नोव्हेंबर रोजी बनाव रचला. 25 नोव्हेंबर रोजी ही सव्वा महिन्याची चिमुरडी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळली होती. तर ही चिमुकली अचानक गायब झाल्याचा कांगावा दिपाली हिने केला होता. घराच्या जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत हा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना हा खून घरातल्याच कोणीतरी केला असावा असा संशय होता. या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर तिची आई रुग्णालयात ॲडमिट झाली होती. त्यामुळे पोलिसांचा दिपाली वरील संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली. सलग तिसरीही मुलगीच झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे ज्या हट्टापायी तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या