पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील 18 मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या रस्त्यांची साफ-सफाई यांत्रिकी पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराने किलोमीटर वाढविण्यासाठी रस्ता साफ न करताच रोडस्वीपर पळवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी लायन सर्व्हिसेस लि. या ठेकेदार कंपनीला आरोग्य विभागाने नोटीस बजाविली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठवून यापुढे कामात हलगर्जीपणा केल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही ठेकेदाराला दिल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली.
महापालिकेमार्फत शहरातील 18 मीटर रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज केले जाते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी 2024 पासून यांत्रिकी पद्धतीने चार पॅकेजमध्ये काम सुरू असून, यासाठी चार एजन्सी कार्यरत आहेत. प्रत्येक पॅकेजमध्ये 2 हेवी रोडस्वीपर, 2 मीडियम रोडस्वीपर, 4 गॉब्लर लिटर पिकर, 2 हूक लोडर, 1 पाण्याचा टँकर आदी वाहनांचा समावेश आहे.या वाहनांचे संचालन करण्यासाठी प्रत्येक पॅकेजमध्ये 32 सफाई कर्मचारी, 9 वाहनचालक, 10 ऑपरेटर, 4 हेल्पर, इत्यादी मनुष्यबळ अशा एकूण 55 कामगारांद्वारे कामकाज करणे अपेक्षित आहे. प्रत्येक रोड स्वीपरद्वारे दररोज 40 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे.
18 मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आठवड्यातून 3 वेळा, बीआरटीएस आणि महामार्ग तेथील फुटपाथ व सर्व्हिस रोडची बाजू यांची आठवड्यातून 3 वेळा, मुख्य मार्गावरील मधला रस्ता यांची आठवड्यातून वेळा साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याच्या कडेच्या भिंतीसह स्ट्रीट फर्निचर्स व ब्रीज सॉफिट्स इत्यादींची साफसफाई आठवड्यातून 1 वेळ करणे बंधनकारक आहे.
पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी ते पिंपरी रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी लायन सर्व्हिसेस लि. या कंपनीकडे आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 23 ऑगस्ट रोजी दापोडी ते पिंपरी या रस्त्यावरील कामकाजाची पाहणी केली. यावेळी रस्ते साफसफाईचे काम सुरू असताना (एम एच-14 एल-3406) या क्रमांकाचा रोड स्विपर ब्रशचा वापर न करता रस्ते सफाई होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोड स्वीपर फक्त किलोमीटर वाढविण्यासाठी रस्त्यावरून फिरवला जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीला आरोग्य विभागाने नोटीस पाठवून खुलासा मागविला. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे लायन सर्व्हिसेस लि. या कंपनी ठेकेदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. तसेच यापुढे कामात हलगर्जीपणा आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही ठेकेदाराला दिल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली.