मोटारीतून पैसे पडल्याची केली बतावणी, 83 हजारांचा ऐवज लंपास

मोटारीतून पैसे खाली पडल्याची बतावणी करून दोघा चोरट्यांना लॅपटॉप, 18 हजारांची रोकड आणि  कागदपत्रे असा 83 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 10 ऑगस्टला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावरील हल्दीराम हॉटेल परिसरात घडली.

विजय जगताप (वय 30 रा. ठाणे ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  विजय हे मोटार चालक असून ते कामानिमित्त ठाणेहून मालकाला घेउन आले होते.  त्यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील हल्दीराम हॉटेल परिसरात मोटार पार्क केली होती. त्यावेळी आलेल्या एकाने मोटारीच्या खिडकीला वाजविले. तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करून लक्ष विचलित केले. रस्त्यावर 80 ते 90 रूपये पडल्याचे दिसल्याने विजयने पैसे उचलण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी चोरट्यांनी मोटारीतून लॅपटॉप, 18 हजारांची रोकड असा मिळून 83 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी दिली आहे.