येरवडा, हडपसरमधील जुगार अड्ड्यांवर छापे, 20 जणांवर गुन्हा

पुणे शहरातील येरवडा आणि हडपसर भागात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यामध्ये 20 जणांवर कारवाई करण्यात आली असून 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

येरवडा येथील भाटनगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ मुंबई मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून येथे  पैशावर जूगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 18 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर   येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांत दाखल करण्यात आला आहे. तर, हडपसरमधील फुरसुंगी येथील साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये काहीजण जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 95 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर खडके, अंमलदार राजेंद्र कुमावत, अण्णा माने, हनमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.