वाहतूक पोलीस निरीक्षकाची दादागिरी, व्यवसायिकाला डांबून केली मारहाण

crime

शहरातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकाने कार्यालयातच एका व्यवसायिकाला ( इंटेरिअर डेकोरेट) डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी समर्थ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याविरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. निरीक्षकाच्या घरातील इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित केले नाही, असे म्हणत दिलेले पैसे परत मागण्यात आल्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या नाना पेठ परिसरातील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम कार्तिक ओझा यांनी घेतले होते. कामाचे कोटेशन पुराणिक यांना देउन कार्तिक यांनी कामाला सुरूवात केली. त्यांच्या घराचे अंतर्गत डिझाईनचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले. त्यावेळी कार्तिक यांनी पुढील कामासाठी आणि कामगारांचे पगार देण्यासाठी पुराणिक यांच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, कामामध्ये चुका काढून पुराणिक यांनी पैसे देणार नाही असे सांगत कर्तिक यांच्याकडेच पैशाची मागणी केली. त्यातूनच पुराणीक यांनी कार्तिक यांना समर्थ वाहतूक विभागात सगळी कागदपत्रे घेऊन बोलवले. तेथे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बुटाने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कार्तिक यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या