पुणे – दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार

फोटो प्रातिनिधीक

दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोघा जणांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील फलटणजवळ घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी येथील सराफाच्या दुकानात शिरून गोळीबार करत लुटले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना या टोळीतील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यांचा पाठलाग करत असताना आज फलटणजवळ वडले गावात सहायक निरीक्षक लांडे यांच्यावर गोळीबार केला आहे. सुदैवाने गोळीबारात लांडे यांना गोळी लागलेली नाही. गोळीबार करून दरोडेखोर उसाच्या शेतात पसार झाले. त्यावेळी लांडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्यांचा पाठलाग करत त्यातील एका दरोडेखोराला पकडले आहे. दोन दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्या दोघांचा शोध घेतला जात आहे. फलटण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लांडे हे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे इंचार्ज असून, त्यांना माहिती मिळाल्याने ते या दरोडेखोरांचा शोध घेत होते.

आपली प्रतिक्रिया द्या