
भुरटे चोर काय चोरतील, याचा काही नेम राहिला नाही. अशीच एक घटना खडकीत घडली असून नशा करण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी चोरट्यांनी चक्क चपलाचे गोदाम फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्ये चप्पलचोर चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सागर दत्ता चांदणे (23), आकाश विक्रम कपूर (22) व अरबाज जाफर शेख (21, तिघे रा. खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरेश श्रीचंद अहुजा (38, रा. पिंपरी) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार हरेश यांचे खडकीत चप्पलचे गोदाम आहे. चोरटय़ांनी 19 मे रोजी गोदाम पह्डून 30 बुटांचे जोड आणि 15 चप्पल जोड असा 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हरेश यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. चप्पल चोरीप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
नशा करण्यासाठी चोरी
आरोपींनी चप्पलचे गोदाम पह्डून 30 हजारांच्या साहित्याची चोरी केली होती. प्राथमिक तपासात संबंधित ऐवजाची विक्री करून येणाऱया पैशातून ते नशा करणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चोरटय़ांनी गोदाम फोडून 30 हजारांची पादत्राणे चोरून नेली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघा जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
- विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे