वारजेतील सराईत आखाडे टोळीवर मोक्का; दरोडेखोर, सराईत टोळ्या रडारवर

फोटो प्रातिनिधीक

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. सोनसाखळी चोरटे, जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर आता मोक्कानुसार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. चतुःशृंगी हडपसरनंतर आता वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आखाडे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

सराईत आखाडे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आकाश उर्फ मुन्ना विष्णू आखाडे (वय -32, रा. सहयोगनगर वारजे), कैलास उर्फ बाल्या गोपाळ खेतावत, दिलीप उर्फ मुन्ना विष्णू आखाडे, सुर्यकांत उर्फ सुरज श्रीमंत दहिरे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून आकाश आखाडे फरार आहे.

आखाडे टोळीने सचिन जाधव (वय – 21, रा. विठ्ठलगनर वारजे) गवंडी काम करणाऱ्याच्या घरात घुसून 10 हजाराची रोकड जबरदस्तीने चोरून नेली होती. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जबर जखमी केले होते. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. मात्र तपासादरम्यान आकाश आखाडे याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे अहवाल सादर केला होता.

आकाश आखाडे याने इतर साथीदारांना बरोबर घेऊन दरोडा, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीरपने घरात घुसने, घातक शस्त्र घेऊन जीवे मारण्याची धमकी देणे, पोलिस आदेशाचा भंग, नागरिकांना मारहाण करणे असे गुन्हे केले आहेत. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईला मंजुरी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या