पुणे – मूल होत नसल्याच्या रागातून पत्नीवर भररस्त्यात कोयत्याने वार

496
crime women

लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मुलं होत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार परिसरातील बिझनेस सेंटरजवळ घडली असून पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आहे.

प्रियदर्शनी प्रवीण हंडे (वय 25) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रवीण हंडे (वय 27) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि प्रियदर्शनी यांचे दोन वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. प्रवणी कार्ले येथे एका खासगी कंपनीत नोकरीला असून प्रियदर्शनी गृहिणी आहे. लग्नानंतर दोन वर्ष होऊनही मूल होत नसल्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे काही दिवसापासून प्रियदर्शनी माहेरी औंधला आल्या होत्या. आज सकाळी प्रियदर्शनी खडकी बाजार येथील बिझनेस सेंटर येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी प्रवीण तेथे आला. त्याठिकाणी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाले. त्याचा राग आल्यामुळे प्रवीणने भररस्त्यात प्रियदर्शनीवर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन प्रवीणला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास खडकी पोलिस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या