Pune: कोरेगाव परिसरात डेंग्युचे रुग्ण वाढले; नागरिकांमध्ये भीती, नगरपंचायत सतर्क

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येत काढ होत आहे. त्यात डेंग्यूच्या साथीचाही समावेश असतो. दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळतात. यंदाही तेच कोरेगाव शहर व परिसरात चित्र पाहायला मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. एकूणच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कोरेगाव तालुका आरोग्य विभाग आणि नगरपंचायतीने शहर व परिसरात सकाळी विशेष शोधमोहीम राबवत डेंग्यू आणि मलेरिया डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट केली आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर गांधीले आणि मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी पत्रकारांना दिली.

कोरेगाव शहरात चार आणि ग्रामीण भागात चार, असे आठ डेंग्यूचे रुग्ण असून, ते उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुंधती कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरेगाव शहर, परिसर व तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर समोर येत आहेत. आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रूपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता पाणीटंचाईमुळे अनेक परिसरात पाणी साठले आहे. तेथे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. कोरेगाव शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर काढत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

साधारणपणे साध्या डेंग्यूची लक्षणे ही अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी त्याचबरोबर हाडे आणि प्रामुख्याने सांध्यांमध्ये वेदना होणे, अशा प्रकारची असतात. डेंग्यूवर ठरावीक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही; पण लवकरात लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असे डॉ. अरुंधती कदम यांनी सांगितले.

सर्दी, ताप, खोकला जाणकल्यानंतर उपचार घ्यावे

सर्दी, ताप, खोकला जाणवल्यानंतर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे. उपचार करताना रुग्णाला लक्षणानुसार औषधं दिली जातात. ताप किंवा अंगदुखी अशा आजारावर औषधं दिली जातात, त्याशिवाय जर स्थिती गंभीर झाली असेल, तर रुग्णालयात दाखलही करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडीस इजिप्ती प्रजातींचे डास तयार होऊ नये, यासाठी काळजी घेणेही गरजेचे आहे.

कोरेगावात विशेष मोहीम

कोरेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिवताप (मलेरिया) आणि डेंग्यू या दोन्ही आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. अशा स्थितीत योग्य ती काळजी घेऊन व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. टी. जाधव यांच्या सूचनेनुसार कोरेगाव शहर व परिसरात विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये कोरेगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी व्ही. बी. ओंबळे, विठ्ठल गुजर, आरोग्य सहायक एस. एम. चौगुले, श्रीमंत माळवे, जे. के. कदम यांच्यासह आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, सर्व गटप्रवर्तक व आशा सेविका या मोहिमेत सहभागी झाले आहेत, अशी माहितीदेखील डॉ. गांधीले यांनी दिली.