पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

59

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ शहरातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाल्याची घोषणा करण्यात आली.

नवनाथ कांबळे हे आज सकाळी आठच्या सुमारास मानिॆग वॉकला जात असताना त्यांना अचानक छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्यांना थेट रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या प्रकृती संदर्भातील बातमी कळताच रुग्णालयाबाहेर रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गर्दी केली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर अनेकांना धक्काच बसला.

नवनाथ कांबळे हे मुळचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे रिपाइंचे कार्यकर्ते. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कांबळे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि कोरेगावपार्क वॉर्डातून विजयी झाले होते. कांबळे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्येही त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या विभागाचे कामकाज पाहिले. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. रिपाइंचे शहराध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषविले होते.

आपली प्रतिक्रिया द्या